नाराजी दूर करत नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट
अक्षराज : विनोद वास्कर
दि.०७, ठाणे : ठाणे लोकसभेत शिंदे सेनेकडून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील गणेश नाईकयांच्यासह नवीमुंबई आणि मीरा भायंदर येथील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती तसेच त्यांनी राजीनामे देखील दिले होते. त्यानंतर नाराज असलेल्या नाईकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी केली होती. त्यानंतर नरेश म्हस्के यांनी मंगळवारी गणेश नाईक यांची भेट घेतली असून त्यांचे आर्शिवाद घेतले आहेत. नवीमुंबईतून म्हस्के यांना मताधिक्य देण्याचे गणेश नाईक यांनी मान्य केले असून त्यांना विजयी करणार असे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता नाईकांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे.
ठाणे लोकसभेची जागा कोण लढविणार यावरुन अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मोठा टीव्स्ट निर्माण झाला होता. अखेर शिंदे सेनेने ठाण्याचा गड राखला आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्याचे पहिले पडसाद नवीमुंबईत उमटल्याचे दिसून आले. नाईक कुटुंबाने नाराजी व्यक्त केली, तसेच त्यांच्या समर्थकांनी बैठक घेत राजीनामे देखील दिले होते. त्यानंतर म्हस्के यांनी त्यांच्या भेटही घेतली होती. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी नाईक फॅमीली देखील ठाण्यात हजर झाली होती. परंतु त्यांची नाराजी फारशी दूर झाल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांची नवीमुंबईत भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या महायुतीच्या बैठकीला देखील नाईक फॅमीलीने दांडी मारली होती. त्यामुळे त्यांची नाराजी अद्याप दूर झालेली नसल्याचे बोलले जात होते. अखेर मंगळवारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांची भेट घेत त्यांचे आर्शिवाद घेतले. यावेळी माजी खासदार संजीवजी नाईक, माजी आमदार संदीपजी नाईक, माजी महापौर सागरजी नाईक उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी नरेश म्हस्के आणि गणेश नाईक यांच्यात चर्चा झाली. प्रचारसभा, चौक सभा, जाहीर सभेबरोबरच घरोघर जाऊन मतदारांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे निर्णय पोहोचविले पाहिजेत. अबकी बार ४०० पार खासदार निवडून यायलाच हवेत अशी भूमिका उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.