कपिल पाटील यांची ‘हॅट्रिक’ होणार कि हुकणार?
सध्या देशभर आणि राज्यात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे, भिवंडी लोकसभा(२३) मतदार संघातून केंद्रीय पंचायत राज खात्याचे राज्यमंत्री कपिल पाटील हे तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. कपिल पाटील हे मुळचे राष्ट्रवादी पक्षाचे. दिवे (हायवे) गावचे सरपंच पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, काही काळ ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देखील राहिले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी ते भाजप मधे आले आणि लोकसभेचे तिकीट मिळवले आणि निवडुन देखील आले. त्या अगोदर काँग्रेसचे सुरेश टावरे हे भिवंडी लोकसभेचे लोकप्रतिनिधीं होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा २००८ पासून अस्तित्वात आला त्या अगोदर ठाणे आणि डहाणू हे दोनच लोकसभेचे मतदारसंघ होते. भारतीय सिमांकन आयोगाच्या शिफारशीनुसार आणि ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर हा वेगळा मतदार संघ पालघर जिल्हात तयार झाला तर ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे तीन लोकसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात निर्माण झाले. भिवंडी मतदारसंघात शहापूर, मुरबाड, भिवंडी (ग्रामीण), भिवंडी (पुर्व), भिवंडी (पश्चिम), कल्याण (पश्चिम) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. शहापूर, मुरबाड हा ग्रामीण भाग, तर इतर चार मतदारसंघ हे शहरी भाग म्हणून ओळखले जातात. या मतदारसंघात स्थानिक आगरी आणि कुणबी समाज मोठ्याप्रमाणावर आहे मात्र कोळी, मराठा तसेच इतर समाजाची संख्या देखील लक्षणीय आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र गेल्या दोन निवडणूकीत भाजप चे कपिल पाटील यांनी विजय मिळवित या मतदारसंघात आपली पकड निर्माण केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी ५२% मते मिळवित काँग्रेस चे सुरेश टावरे यांचा दीड लाख मताधिक्याने पराभव केला होता, मोदी – २ च्या कार्यकाळात त्यांना केंद्रीय राज्यमंत्री (पंचायत राज विभाग) म्हणून संधी मिळाली, ठाणे जिल्ह्याला त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी केंद्रातून मोठा निधी आणला, केंद्राच्या अनेक योजना राबविल्या. केंद्रात आणि राज्यात डबल ईंजीना’चे सरकार असल्याचा फायदा करून घेत एमएमआरडीए च्या माध्यमातून घेत भिवंडी, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, या भागात मोठय़ा प्रमाणावर विकासकामांचा धडाका लावला आहे. बहुप्रतीक्षित कल्याण – मुरबाड रेल्वे मार्गाचे अनेकदा सर्वेक्षण झाले मात्र गेल्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच आर्थिक तरतूद करण्यात आली आणि आता जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. मात्र शहापूर, मुरबाड सारख्या ग्रामीण भागात त्या प्रमाणात विकास कामे झाली नाहीत.शहापुर तालुक्यातून कसारा, आसनगाव, आटगाव, वासिंद या परिसरातून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात, मात्र वाढते नागरिककरण आणि शहरीकरणामुळे दिवसेंदिवस प्रवाश्यांची संख्या वाढत आहे आणि लोकल फेऱ्यांची संख्या अपुरी आहे, यामुळे प्रवाशांमध्ये मोठा असंतोष असुन कपिल पाटील यांनी या बाबत उदासिनताच दाखवली अशी प्रवाशांची भावना आहे.
या निवडणुकीत तीन राष्ट्रीय पक्षाचे , सात राज्य स्तरीय नोंदणीकृत पक्षाचे तर सतरा अपक्ष असे ऐकुण सत्तावीस उमेदवार उभे आहेत, मात्र खरी लढत कपिल पाटील (महायुती ), सुरेश म्हात्रे (इंडिया आघाडी) आणि अपक्ष निलेश सांबरे यांच्यात होणार आहे.सुरेश म्हात्रे यांनी २०१४ साली मनसे कडून निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले. वास्तविक ही जागा काँग्रेसची होती काँग्रेस कडुन दयानंद चोरघे हे गेल्या तीन-चार वर्षांपासून जोरदार तयारी करीत होते, मात्र खुद्द शरद पवार यांनीच सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसला ही जागा सोडावी लागली. ठाणे, पालघर जिल्हात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी मोठे काम केले आहे ते पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत पालघर जिल्हा बरोबरच ठाणे जिल्ह्यात त्यांनी आपल्या जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून आपले स्थान निर्माण केले आहे. ते भिवंडी तुन निवडणूक लढविणार आहेत वंचित आघाडी ने त्यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र ते अपक्ष लढण्याची तयारी करीत आहे. सुरेश म्हात्रे हे मविआ चे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ऊबाठा) गटाची ताकद त्यांच्या पाठिशी आहे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फोडले गेले ते सामान्य जनतेला रूचलेले नाही, ठाणे जिल्ह्यात शरद पवार, ऊद्वव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे शिवाय सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे करु शकतात असा अनेकांचा कयास आहे. भाजप कडुन कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा शहापूर तालुक्यातील शिवसेना (शिंदे) गटाकडून जाहीर नाराजी व्यक्त केली होती मात्र अल्पकाळातच मतपरिवर्तन झाले आणि शहापूर मतदारसंघातुन एक लाखांचे मताधिक्य मिळवून देऊ असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी कपिल पाटील यांना आश्वासन दिले. कपिल पाटील यांना कुणबी सेना, आरपीआय, बसपा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शहापूर चे आमदार दौलत दरोडा हे अजित पवार गटात आहेत तर माजी आमदार पांडुरंग बरोरा हे पवार गटात आहेत. कल्याण पश्चिम मधुन भोईर हे शिवसेनेचे आमदार आहेत. भिवंडी पश्चिम मधुन महेश चौगुले हे भाजपचे, भिवंडी (पुर्व) मधुन समाजवादी पक्षाचे रईस शेख, तर भिवंडी ग्रामीण मधुन शिवसेना (शिंदे) शांताराम मोरे हे आमदार आहेत. मात्र देश कि हवा बदल रही है हे देखील तितकेच खरे आहे. मुरबाड चे आमदार किसन कथोरे हे देखील भाजप मधुन इच्छुक होते ते आणि कपिल पाटील यांच्यात आता समेट झाला आहे, दोघेही मुळचे राष्ट्रवादीचे, मात्र आता दोघेही भाजपचे आहेत. महायुती आणि मविआ दोघांमधेही गट-तट आहे, मनभेद, मतभेद आहेत. सुरेश म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केला आणि तिकिट मिळवले, मात्र कपिल पाटील यांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरुन जनतेमधे नाराजी आहे.पंधरा दिवसापूर्वी कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचा कार्यकर्त मेळावा पार पडला. सुरेश म्हात्रे हे देखील मतदारसंघ पिंजून काढत आहेत.कपिल पाटील यांच्या कार्यपद्धतीवरून देखील मतदारसंघात नाराजी आहे. सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या उमेदवारीने निवडणूक चुरशीची होणार आहे. जवळपास वीस लाख मतदार संख्या असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे त्यावेळी मतदार कोणाला कौल देतात हे निश्चित होईल, मात्र ही निवडणूक कपिल पाटील यांच्या साठी सोपी नाही. ४ जुन रोजी कपिल पाटील हॅट्रिक करतात कि त्यांची हॅट्रिक हुकणार हे स्पष्ट होईल.