spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

प्लास्टिकबंदी अनिवार्य !

प्लास्टिकबंदी अनिवार्य !

              सध्या देशभरात लोकशाहीचा महोत्सव साजरा केला जात आहे, काही भागांत निवडणूक झाल्या आहेत, तर काही भागांत होणे बाकी आहेत. त्यादृष्टीने निवडणुकांचा प्रचारही देशभरात जोरदारपणे सुरु आहे. प्रत्येक लोकसभा क्षेत्रातून प्रतिदिन हजारो कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ जनसंपर्क आणि प्रचारफेऱ्यांसाठी फिरत आहेत, निवडणूक प्रचारासाठी ठिकठिकाणी हजारोंच्या सभा घेतल्या जात आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि त्यातही यंदा पारा भलताच चढल्याने उन्हाच्या झळा अधिक प्रमाणात जाणवत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लोक अधिकाधिक पाणी पित आहेत. प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यालयांत आज पाण्याच्या बाटल्यांचे मनोरे रचलेले पाहायला मिळत आहेत. प्रतिदिन  हजारो बाटल्या रित्या होऊन त्या इतरत्र टाकलया जात आहेत. सभा संपल्यावर सर्वत्र पाण्याच्या बाटल्यांचाच खच पडलेला पाहायला मिळतो आहे. पक्षांच्या मिरवणूका, निवडणूक अर्ज भरण्यासाठी केले जात असलेले शक्तिप्रदर्शन यावेळीही मिरवणूक मार्गात रस्त्याच्या कडेला सर्वत्र पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे सध्या लगीनसराई सुरु असल्याने शहराकडील भागांत होणाऱ्या लग्नांत पिण्याच्या पाण्यासाठी सीलबंद पाण्याच्या बाटल्याच सर्रासपणे वापरल्या जात आहेत. याठिकाणीही पाहुणी मंडळी गेल्यानंतर सर्वत्र बाटल्याचा बाटल्या पडलेल्या पाहायला मिळत आहेत. दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सीलबंद पाण्याच्या बाटल्यांमुळे त्या बनवणाऱ्या कंपन्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. एकीकडे सरकार प्लास्टिक वापरावर अंकुश आणण्यासाठी जनप्रबोधन करत आहे आणि दुसरीकडे सरकार चालवणारी मंडळी पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा बेसुमार वापर करत आहेत.

                प्लास्टिकच्या अतिवापरामुळे वातावरणात सर्वत्र प्लास्टिकचे अदृश्य सूक्ष्म कण पसरलेले आहेत जे आपल्या डोळ्यांनी दिसत नसले, तरी वातावरणातील अन्न, पाणी आणि हवा यामंध्ये ते मिसळलेले असतात आणि या सर्व माध्यमांतून ते आपल्या शरीरात जात असतात. एक लिटर पाण्याच्या रिकाम्या बाटलीत प्लास्टिकचे सुमारे २ लक्ष ४० हजार अत्यंत बारीक तुकडे असतात. दरवर्षी, जगभरात ४०० दशलक्ष मेट्रिक टन  प्लास्टिक तयार केले जाते त्यापैकी  ३ कोटी टनांहून अधिक प्लास्टिक पाण्यात टाकले जाते किंवा जमिनीत पुरले जाते. अनेक वर्षे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते हवेद्वारे आपल्या श्वासात प्रवेश करते, मातीत मिसळते आणि पिकांमार्फत आणि झाडांमार्फत ते आपल्या अन्नात प्रवेश करते. मानवाने मानवाच्या सुविधेसाठी निर्माण केलेला प्लास्टिकचा भस्मासुर शेवटी मानवालाच भस्म करत आहे. श्वासावाटे  फुफ्फुसात गेलेले प्लास्टिक कण फुफ्फुसाला हानी पोहोचवत आहेत. फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. प्लास्टिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.

राज्यात ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यावर बंदी घालण्यात आली आहे, तरिही आज बाजारात गेल्यावर भाजी, फळ, मासे, मांस यांच्या विक्रेत्यांकडून या पातळ पिशव्या न मागताही मिळू लागल्या आहेत. २६ जुलै.२००५ या दिवशी मुंबईत आलेल्या महाप्रलयाने मुंबईची तुंबई केली होती. यावेळी मनुष्यहानीसह अपरिमित वित्त हानीही झाली होती. यावेळी पाणी तुंबून राहण्यामागे इतस्तत: फेकल्या गेलेल्या प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचे लक्षात आल्यावर मुंबईसह राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदिला आज पुरता हरताल फासला गेला आहे. अन्नाच्या शोधात वणवण भटकणाऱ्या जनावरांच्या पोटात या प्लास्टिकच्या पिशव्या गेल्याने दरवर्षी कितीतरी प्राण्यांचा मृत्यू होतो. पर्यावरणासह  जैविक आणि वित्तीय हानी करणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदिही आज केवळ नावाला शिल्लक आहे.

डॉ. परव शर्मा  यांनी केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट केले आहे कि प्लास्टिकमध्ये असलेले शिसे, पारा आणि कॅडमियम यांमुळे  जन्मजात विकार होऊ शकतात.  प्लास्टिकमध्ये ‘बीपीए बिस्फेनॉल ए’ हे घातक विष असते, जे झाडे, झुडपे आणि पिकांना हानी पोहोचवते. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे दमा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होतो. अन्नाद्वारे पोटात जाणारे प्लास्टिक कण यकृत आणि मूत्रपिंड यांना हानी पोहोचवतात. प्लास्टिक कणांमुळे मेंदूलाही इजा पोहोचू शकते. ल्युकेमिया, लिंफोमा, मेंदूचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर तसेच प्रजनन क्षमता कमी होणे यांसारखे विकार  प्लास्टिकच्या कणांमुळे जडू शकतात. प्लास्टिकचे धोके लक्षात आणून देणाऱ्या अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था आज कार्यरत आहेत. सरकारही विविध माध्यमांतून दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी जनजागृती करत असते; मात्र  प्लास्टिकच्या वापरावर हवा तसा अंकुश आणण्यासाठी आज काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पर्यावरण मंत्री मान. आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत काही ठोस निर्णय घेतले होते; मात्र सरकार बदलल्यानंतर पुन्हा प्लास्टिकचा बेसुमार वापर सुरु झाला आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची आज आपल्याला एव्हढी सवय झाली आहे कि प्लास्टिक बंदी झाल्यावर काय होईल याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची आणि आरोग्याची अपरिमित हानी लक्षात घेता प्लास्टिकचा वापर टाळणेच आपल्या हिताचे आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आज त्यावर उपाय काढले नाहीत, तर भविष्यात फार मोठ्या संकटाला तोंड देऊ लागू शकते हे निश्चित आहे.

जगन घाणेकरघाटकोपर (मुंबई) 
संपर्क: ९६६४५५९७८०

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: