चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वाराला लुटले ! अर्धापूर ते मेंढला रोडवरील घटना
अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.१५, नांदेड : अर्धापूर तालूक्यातील वसमत फाटा ते मेंढला या महामार्गावर दि. १४ मे रोजी रात्री रस्त्याने जाणा-या एका दुचाकीला अडवून चाकूचा धाक दाखवत चार अज्ञात चोरट्यांनी दुचाकीस्वाराकडील दोन लाख रूपये घेवून पोबारा केला. ही घटना मेंढला शिवारातील आंब्याचा मळा रोडवर मंगळवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्धापूर शहरातील ऑनलाईन मल्टी सर्व्हीसेस चे संचालक देवराज शंकरराव नवले रा.मेंढला ता.अर्धापूर आणि त्यांचा सहकारी चांदू नामक व्यक्ती हे दोघे जण मल्टी सर्व्हिसेसचे काम आटोपून दि.१४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान दुचाकीवरून मेंढला या आपल्या गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी वसमत फाटा ते मेंढला रोडवरील आंब्याचा मळा येथे आली आणि एक कार दुचाकी समोर आडवी लावली. या कारमधील चार अनोळखी व्यक्ती खाली उतरले आणि चक्क सिनेमा स्टॉईलने धारदार चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वार देवराज नवले यांच्या जवळील दोन लाख रुपये व मोबाईल काढून घेतला. तसेच सोबत असणारे चांदू यांच्या खिशातील दोन मोबाईल घेवून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून पसार झाले.
या घटनेनंतर रात्री उशिरा देवराज नवले यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द कलम ३९४, ३४ भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत. या घटनेतील चोरट्यांचा शोध घेवून जेरबंद करणे पोलीसापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
मागील कांही दिवसापासून अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागामध्ये चोरी, घरफोडी, रस्त्यावर लुटमार करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून या पूर्वी देखील तालुक्यात अनेक चोरी आणि लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. तर दोन दिवसांपुर्वीच भोकर फाटा परिसरात तोतया पोलीसांनी आयशर चालकाला एक लाखाला लुटले होते. याचा तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.