भद्रकालीत वाहनांची जाळपोळ! गुन्हा दाखल…
अक्षराज : प्रतिनिधी
दि.१७, नाशिक : लोकसभा निवडणूक निर्भय आणि दहशतमुक्त वातावरणात करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी शहरात गुन्हेगारी कृत्य वारंवार होत असून जुने नाशिक परिसरातील भद्रकालीत नऊ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला असून भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकाली परिसरात याआधीही दोन ते तीन वेळा वाहने जाळपोळीचे प्रकार घडले आहेत.
त्यावेळी वैयक्तिक वादातून जाळपोळीचे प्रकार घडल्याचे तपासात उघड झाले होते. बुधवारी रात्री अमरधाम परिसरातील रस्त्यावर जहांगीर कब्रस्तान आहे. या परिसरातील शहा बाबा दर्गाजवळील नवाज अब्दुल शहा यांच्या घरासमोर त्यांच्या दुचाकीसह अन्य लोकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असतात. समाजकंटकांनी नऊ दुचाकी, तीन कार आणि एक मालमोटार या वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवली. वाहनांनी पेट घेतल्यानंतर समाजकंटकांनी पळ काढला. वाहनांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अज्ञातांनी कब्रस्तानजवळील एका घरावर पेटती बाटली टाकून घर जाळण्याचा प्रयत्नही केला गेला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.