लोकसभेच्या निवडणुकीत झाली विधानसभेची पायाभरणी
अक्षराज : वसंत रांधवण
दि.२८, अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीच्या व भाजपाच्या उमेदवाराकडून जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र या निमित्ताने या दोन्ही पक्षातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणूकीची पायभरणी करून घेतली आहे. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
सध्या लोकसभा मतदारसंघात ४ जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व महायुतीचे उमेदवार सुजय विखे या दोन्हीचा कार्यकर्त्यांनी तेवढ्याच ताकदीने प्रचार यंत्रणेचा वापर केला. मतदार संघामध्ये पक्ष अथवा उमेदवार यांच्यामध्ये प्रचारासाठी जास्त खर्च केला जात नाही. किंवा त्यासाठी मोठे प्रयत्न केले जात नाही. केवळ पक्षीय पातळीवर राबविल्या जाणाऱ्या प्रचार यंत्रणेवर ही निवडणूक राबविली जाते. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्या पेक्षा सुजय विखे निवडणूक खर्चात आघाडीवर असल्याचे सांगितले जाते.
आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका प्रचाराचा आपल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी फायद्याचा कसा ठरेल, या दृष्टीने विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार यांच्याकडून मोठे प्रयत्न केले गेले.
या लोकसभेच्या निवडणुकीत कोणताही उमेदवार विजयी झाला तरीही प्रचार यंत्रणा राबवणाऱ्यांचे काही देणे – घेणे नाही. आपल्या विधानसभेच्या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहचण्याची ही एक नामी संधी त्यांना मिळाली. याचा पूरेपूर वापर आणि फायदा दोन्ही पक्षातील आजी- माजी आमदारांसह इच्छुक उमेदवारांनी करून घेतला. मात्र श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित नसल्यामुळे इच्छुकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराबरोबर राहून लोकांपर्यंत पोहचण्यावर इच्छुकांनी भर दिला आहे. लोकसभा निवडणूक प्रचार यंत्रणा राबवताना प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी मतदार संघात जात होते. लोकसभा निवडणूक उमेदवाराला प्रत्येक मतदारांपर्यंत पोचणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांचा प्रचार कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर अवलंबून असतो. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांबरोबर त्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार आपली प्रचार यंत्रणा राबवितो. त्या निमित्ताने प्रतेक मतदारसंघातील लोकांपर्यंत आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडताना दिसून आले.
त्यामुळे त्यांना निवडणुकीवेळी त्याची मदत होणार आहे. साहजिकच सर्वत्र हे चित्र पहायला मिळत आहे. बहुसंख्य ठिकाणी विद्यमान आमदार हेच उमेदवार असतात. अपवादात्मक परिस्थितीत दूसरा उमेदवार दिला जातो. विधानसभेला युती झाली तर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित आहे; पण आघाडी झाल्यास ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. आघाडीत घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचाच दावा राहिल. त्यामुळे लोकसभेच्या धामधुमीत इच्छुक आपापल्या परीने प्रयत्नांना लागलेले आहेत. शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे घनश्याम शेलार तर अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे तर भाजपकडून बबनराव पाचपुते यांची नावे चर्चेत आहेत. ते आपल्याला तऱ्हेने मयत दहावा वाढदिवस लग्न तसेच मुंज अश्या अनेक कार्यक्रमाला हजेरी लावत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांकडूनही उमेदवार कोण असेल, अशी मागणी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली जात आहे.
यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किंवा भाजपचे उमेदवार विजयी झाले याचे कोणालाही आनंद अथवा दुःख होणार नाही. आपल्याला विधानसभेची जोरदार पायभरणी म्हणजे धर्मावर सोमवार सोडल्या प्रमाणे झाली. याचे समाधान मात्र सर्वांनाच मिळणार आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लंके आणि भाजपचे सुजय विखे यांना आपला विजय निश्चित वाटत असला तरी खात्री मात्र एकालाही नाही. यात विजयी होणारा आनंदी तर पराभव होणारा दुःखी असे होणार असले तरी समाधानी मात्र सर्वच पक्षातील नेते होणार आहेत.