एक्झिट पोलच्या अंदाजाने महायुती – महाविकास आघाडीत “कही खुशी आणि कही गम”
अक्षराज : वसंत रांधवण
दि.०३, अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्यास आता आवघे काही तास उरले असतानाच शनिवारी रात्री जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे अनेकांची झोप उडाली आहे. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत असल्याचे अंदाज सर्व वृत्तवाहिन्या व संस्थांनी केले आहे. मात्र त्याचबरोबरच महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये काट्याची टक्कर होत असून ४८ पैकी निम्म्या जागा एक, दोन कमी अधिकच्या फरकाने दोन्ही आघाडीला मिळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात दोन्ही आघाडीतील नेत्यांना ` कभी खुशी कभी गम ‘ या दोन्हींचा प्रत्यय येत आहे.
शनिवारी (दि.१) सायंकाळी सहानंतर देशातील सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यावर देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत एक्झिट पोल जाहीर झाले. यात महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभेच्या जागेचा समावेश असून विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीतील राजकीय पक्षांसोबत नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, उद्या ४ जूनला मतमोजणी होणार्या नगर जिल्ह्यातील दोनही जागांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असून त्याठिकाणी चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान झाले होते. मतदान झाल्यानंतर निवडणुकीतील सर्वच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून विजयांचे अंदाज बांधण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिणेतील लोकसभेची निवडणूक चांगलीच चुरशी झालेली असून महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या राजकीय सभा, रॅली झाल्या होत्या. तर विरोधी महाविकास आघाडीसाठी ज्येष्ठनेते खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आ. बाळासाहेब थोरात, खा. सुप्रिया सुळे, आ. आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठा पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. यासह वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यामान खा. सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात माजी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात सरळ लढत होईल, असे वाटत असताना ऐनवेळी वंचितकडून उत्कर्षा रूपवते यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत वाढवली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६३.३ टक्के मतदान झाले असून मतदार राजाचा कौल कोणाला मिळणार हे उद्या दि. ४ जूनला दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. शिर्डीत आजी – माजी खासदारांमध्ये लढत असून वंचित बहुजन रुपवते यांची उमेदवारी कोणाला भोवणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरलेले माजी आ. निलेश लंके यांनी कडवे आव्हान दिले. मात्र, हे आव्हान मतदानाच्या स्वरूपात लंके यांच्या पारड्यात पडणार ? यासाठी मतमोजणीच्या २५ पेक्षा अधिक फेऱ्या होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. नगर लोकसभेसाठी ६६.६१ टक्के मतदान झालेले असून मागील पंचवार्षिक तुलनेत ते दोन टक्क्यांच्या जवळपास वाढलेले आहे. याठिकाणी ग्रामीण भागासह नगर शहरात कोण आघाडीवर राहणारा याबाबत अंदाज बांधण्यात येत असून अनेक ठिकाणी पैजा लावण्यात आलेल्या आहेत. या मतदारसंघात निवडणूकीतील दोन उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहे. दरम्यान, एक्झिट पोल नंतर नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगरच्या जागेवरून निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांची धाकधूक वाढली आहे.