“पावसाळ्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले….”
वीज कंपनीला दरवर्षीच पावसाची ऍलर्जी
अक्षराज : प्रतिनिधी
दि.२४, शिरपूर (धुळे) : सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधीतरी पावसाची सर किंवा थोडा वाराही रात्रीच्या वेळेस आला म्हणजे वीज वितरण कंपनीकडून ग्रामीण भागातील वीज बंद करण्याचे प्रकार घडत आहेत. थोड्या दिवसापूर्वीच्या वादळी वारा व विजांचा कडकडाटासह झालेल्या चक्रीवादळाने वीज वितरणचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून सावरत वीज व्यवस्थित होत नाही तोच, आता साधा वारा किंवा पावसाचे थेंबही सुरू झाले म्हणजे वीज वितरण कंपनीकडून वीज गुल केल्या जात असल्याने ग्राहकात त्यांचेप्रति प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
सद्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचे पहिले एक दोन आठवडे उन्हाच्या झळा सोबतच कधीतरी पावसाच्या सरी कोसळत असतात. त्यामुळे अति प्रमाणात उकाळा होत असल्याने जनता घामाघूम होत पंख्याचा किंवा कुलरचा आसरा घेण्याच्या स्थितीत असतांना शक्यतो ग्रामीण भागात विजेचे अघोषित भारनियमन करण्याचे प्रकार हे कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा या प्रकारामुळे जनता त्रस्त झाली असून याच वेळेस हे प्रकार हा होतात असा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे. तसेही पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून कामे ज्यात तारेवरील झाडे तोडणे किंवा इतर तांत्रिक बाबीतून कामे आटोपली असली तरी वादळी वारा नसतांना ही वीज गुल होतेच कशी असाही प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या १५ – २० दिवसात तर ग्रामीण भागात दिवसभरातून एक एक, दीड दीड तास वीज गायब असते. संध्याकाळी व रात्री पण असाच प्रकार सुरू राहत असल्यामुळे वीज ग्राहक सद्या त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
“लोड डीवाइड केला नसल्याने फ्युज उडण्याचे प्रकार वाढले.”
ग्रामीण भागातील अनेक गावांत वीज रोहित्र कमी व वीज ग्राहक जास्त असल्यामुळे फ्यूज टिकत नाही.एवढेच काय वीज रोहित्रापासून शेवटच्या पोलवरील कनेक्शन धारकांना तर अतिशय वीज कमी मिळत असल्याने पंखा तर सोडा लाइटही चांगले प्रकाश देत नाही.
“सुविधा नसतांना वसुलीला प्राधान्य.”
आजरोजी प्रत्येक गावात वायरमन नियुक्त असला तरी मुख्यालयी बोटावर मोजण्या इतकेच वायरमन गावात तत्पर सेवा देत असून वीज रोहित्रावरचे फ्यूज टाकण्याचे काम स्थानिक नागरिकांनाच करावे लागत आहे. सुविधा देण्याकडे दुर्लक्ष मात्र महिना संपत नाही तोच वीज बिल वसुलीसाठी संबंधित वीज तोडण्याची धमकी देऊन बील वसुलीच करत आहेत.