पावसाने मुंबईची दैना का झाली?
मुंबईत मान्सूनने जोरदार सलामी दिली आहे. मागील दोन तीन दिवसांपासून मुंबईत चालू असलेल्या पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवली. सोमवारी तर मुंबईत ३०० मिली पेक्षा अधिक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. जागोजागी गुडघाभर पाणी साचले. रस्त्यांवर देखील पाणी साचले. रस्त्यांवर पाणी आल्याने रस्ते वाहतूक खोळंबली. महामार्गावर पाणी आल्याने शेकडो गाड्या जागेवरच थांबल्या त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. रिक्षा, टॅक्सी यांनी जणू अघोषित संप पुकारला.
रेल्वे मार्गावर पाणी साचून रूळ पाण्याखाली गेल्याने काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. काहींच्या मार्गात बदल करावे लागले. काही मार्गावरील लोकल रद्द कराव्या लागल्या तर काही मार्गावर धीम्या गतीने लोकल सोडाव्या लागल्या. पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. विमान तळावर पाणी आल्याने विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. लोकांच्या घरात पाणी साचल्याने लोकांचा संसार पाण्याखाली गेला. एकूणच पावसाने मुंबईची चांगलीच दैना उडवली. या पावसाने २६ जुलै २००५ रोजी झालेल्या प्रलयकारी पावसाची आठवण झाली. पावसामुळे मुंबईची दैना झाल्यावर नेहमीप्रमाणे दोषारोपांची मालिका सुरू झाली. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झाडू लागले. मोठ्या पावसाने मुंबईची दैना झाली याला जबाबदार कोण ? यावर राजकारण सुरू झाले ; पण मोठ्या पावसानंतर मुंबईची दैना का होते ? पाऊस वाढला की मुंबईची तुंबई का होते ? या प्रश्नाकडे मात्र सर्वच पक्ष सोईस्कर डोळेझाक करीत आहेत. २६ जुलैच्या पावसानंतर शासन, प्रशासन आणि नागरिकांनीही कोणताच धडा घेतला नाही म्हणूनच ही वेळ पुन्हा आली. पूर्वी मुंबईत मोकळ्या जागा असायच्या त्यामुळे तिथे पाण्याचा निचरा व्हायचा. पण आता मुंबईत मोकळ्या जागाच राहिल्या नाहीत. विकासाच्या नावाखाली मुंबई सिमेंटचे जंगल बनले आहे. मुंबईतील रस्तेही सिमेंटचे आणि पेव्हर ब्लॉकचे बनले आहे त्यामुळे पाणी मुरायला मुंबईत जागाच नसते. त्यात मोठा पाऊस आणि भरती एकाच वेळी आली तर ते सर्व पाणी नागरी वस्तीतच शिरते. मुंबई तुंबण्याचे आणखी एक कारण म्हणजे प्लास्टिक ! राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी मुंबईत दररोज हजारो टण प्लास्टिक कचरा जमा होतो. या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. हे प्लास्टिक नदी, नाल्यामध्ये अडकल्याने तेथून पावसाचे पाणी वाहत जाण्यास अडचण निर्माण होते. राज्य सरकारने प्लास्टिकवर घातलेली बंदी किती योग्य आहे हे या पावसामुळे तरी नागरिकांना समजेल. नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. यासोबतच नागरिकांनी वाटेल तिथे कचरा टाकायची सवयही मोडायला हवी. ग्लोबल वॉर्मिगमुळे दरवर्षी मुंबईच्या समुद्र पातळीत वाढ होतेय. मुंबई तुंबण्याचे हे ही एक कारण आहे. पावसामुळे केवळ मुंबईचीच नाही तर सर्वच मोठ्या शहरांची अशीच अवस्था होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली जलमय झाल्याचे आपण पाहिलेच आहे. चार वर्षापुर्वी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचीही पावसामुळे दैना झाली होती. मुसळधार पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेले होते. त्यावेळी विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू होते. इतका पाऊस झाला की पावसाचे पाणी थेट विधान भवनात शिरले होते. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन तहकूब करावे लागले. पावसामुळे विधिमंडळाचे अधिवेशन तहकूब करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. पावसामुळे विधिमंडळाचे अधिवेशन तहकूब करण्याची इतिहासातील ती पहिलीच वेळ होती. मागील काही वर्षात पावसामुळे पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर ही शहरे जलमय झाल्याचे आपण पाहिले आहे.
राज्यातील सर्वच शहरात कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. पाऊसही बेभरवशाचा झाला आहे. पूर्वीसारखा पावसाचा देखील अंदाज येत नाही. दोन दोन महिने न येणारा पाऊस दोन तासात येऊन दोन महिन्यांची सरासरी गाठतो. या सर्व परिस्थितीचा विचार करता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यासारख्या मोठ्या शहरांच्या नियोजनाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. जलव्यवस्थापनाची आजची पद्धत बदलून नवीन पद्धतीचा अवलंब करायला हवा. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. त्यासाठी परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. परदेशातील जलव्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांना परदेशात पाठवायला हवे. परदेशातील अधिकाऱ्यांची त्यासाठी मदत घ्यायला हवी.
– श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५