spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

शासकीय रेखाकला परीक्षांचे महत्त्व !

«« शासकीय रेखाकला परीक्षांचे महत्त्व ! »»
कला शिक्षणात शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांचे खूप मोठे महत्त्व आहे. या रेखाकला परीक्षांना कला शिक्षणाचे महाद्वारच म्हणता येईल. १८८० साली सुरु झालेल्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षांना यंदा १४४ वर्षे झाली आहेत. १८८० साली या परीक्षेस केवळ १८ विद्यार्थी बसले होते. त्यामधून एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाला होता. आज या परीक्षांना लाखो विद्यार्थी बसतात.  मुंबईमधून या  परीक्षांना सुरुवात झाली. या परीक्षा महाराष्ट्र, मध्यप्रदेश राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा, दिल्ली इ. राज्यांतून विद्यार्थी या परीक्षांना बसतात. सुरुवातीच्या काळात फर्स्ट ग्रेड, सेंकड ग्रेड व थर्ड ग्रेड या नावाने घेतल्या जात होत्या. १९१७ साली अभ्यासक्रमात प्रथम बदल झाला. तेव्हापासून एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा या नावाने या परीक्षा आजपर्यंत घेतल्या जात आहेत. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात दुसरा सुधारित बदल करण्यात आला तो १९४७ साली. या दोन्ही परीक्षांमध्ये सहा विषय घेण्यात येत होते. स्थिरचित्र , स्मरणचित्र, निसर्गचित्र मुक्तहस्तचित्र, संकल्पचित्र कर्तव्य भूमिती( प्रमाणपट्टी व अक्षरलेखन) गेल्या अनेक वर्षांपासून रेखाकला परीक्षांना लक्षावधी विद्यार्थी बसत आहेत. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये सुरु झालेल्या या ग्रेड परीक्षा संपूर्ण भारतात  घेतल्या जातात.
या परीक्षांचा सुधारीत तिसरा बदल २०१४ साली करण्यात आला. सहा विषयांपैकी चार विषय ग्रेड परीक्षेसाठी ठेवण्यात आले. यामध्ये निसर्गचित्र व मुक्तहस्तचित्र हे दोन विषय वगळण्यात आले. पूर्वी होणाऱ्या परीक्षा व आता होणाऱ्या  परीक्षांमध्ये अमुलाग्रह असे काळानुरूप बदल  झालेले आहेत. या परीक्षेतील विषयाचा बदल, ऑनलाईन प्रवेश, निकाल व प्रमाणपत्र प्रक्रिया असे बदल झालेले दिसतात. या दोन्ही  परीक्षांमध्ये एकूण चार  विषय असतात, एलिमेंटरीसाठी वस्तुचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन व इंटरमिजिएटसाठी स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, कर्तव्य भूमिती घनभूमिती व अक्षरलेखन असे विषय असतात. संपूर्ण भारतात हजारोंपेक्षा जास्त केंद्रावरून या परीक्षा होतात. या परीक्षांसाठी ऑनलाइन नाव नोंदणी, फाॅर्म भरणे इ. बाबी सर्व केंद्रप्रमुख जुलै ऑगस्ट महिन्यात पूर्ण करतात. एलिमेंटरी परीक्षेसाठी ५० रुपये व इंटरमिजिएट परीक्षेसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क कला-संचालनाकडून आकारण्यात येते. यावर्षी या परीक्षा २५सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत होत आहेत. ड्रॉइंग ग्रेड परीक्षा मुख्यतः माध्यमिक शाळेतील विद्यार्थी  बसतात या परीक्षा साधारणतः वयाच्या १२ वर्षांच्या पुढील विद्यार्थी बसू शकतात. विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आस्था निर्माण करणे कलेसंबंधी योग्य व हितावह अशा मनोवृत्तीचा विकास घडविणे, उत्तम अभिरुचीची जोपासना करणे आणि कलारसग्रहण करण्याच्या क्षमतेचा परिपोष करणे हे यामागील उद्देश आहेत.
या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच (फॉऊंडेशन, आर्ट टिचर डिप्लोमा, कमर्शियल आर्ट, फाईन आर्ट , टेक्सटाईल डिझाइनिंग इंटेरियल डेकोरेटर फॅशन डिझाईनिंग, आर्किटेक्ट, फोटोग्राफी ग्राफिक डिझाईन, शिल्पकला, सिरॅमिक व पॉटरी. जी. डी.आर्ट ॲनिमेशन इ.) विशेष उच्च अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. बारावीच्या परीक्षेनंतर उच्च अभ्यासक्रमासाठी शासकीय कला महाविद्यालयात प्रवेशासाठी या परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या दहावी बोर्ड परीक्षेत ‘अ’ श्रेणीसाठी ७ गुण ‘ब’ श्रेणीसाठी ५ गुण व ‘क’ श्रेणीसाठी ३ गुण वाढवून मिळतात. या परीक्षांच्या माध्यमातून छोट्या छोट्या बालकलाकारांमध्ये चित्रकलेचे अंकुर फुलवणे आणि जोपासणा केली जाते. चित्रकला हा विषय अन्य कोणत्याही विषयांपेक्षा कमी महत्त्वाचा नाही. किंबहुना या विषयांच्या माध्यमांतूनच मुलांचे संपूर्ण व्यक्तिमत्व फुलते. फुलांना जसे त्यांच्या  कलाने फुलू द्यावे तसेच मुलांनाही त्यांच्या कलाने त्यांची कला जोपासू द्यावे.
मुलांच्या शारीरिक व मानसिक बौद्धीक विकासासाठी कला या विषयाची गरज महत्त्वाची ठरते. त्यासाठी पालकांनी योग्य ते सहकार्य आपल्या पाल्यांना करावे. पारंपारिक पद्धतीने चित्रकला या विषयाकडे न पाहता विद्यार्थ्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवणारी  कला म्हणून तिचा अभ्यास व्हावा आणि विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलता उमलविण्यासाठी तिचा उपयोग व्हावा, मुले शब्दांपेक्षा चित्रातून सहज प्रकट होतात. स्वतःला व्यक्त करण्यासाठी शब्दांपेक्षा त्यांना कलेचे माध्यम अधिक जवळचे वाटते. मुलांची सौंदर्य अभिरूची वाढविणे, त्यांचा बौद्धीक विकास करणे या दृष्टीने या  परीक्षा घेण्यात येतात. अशा रीतीने भारतातील तरुण पिढीमध्ये कलेची आवड निर्माण करण्यासाठी व कलाप्रसार करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी ह्या परीक्षांनी बजावली आहे. कला , तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांत पदार्पण करणाऱ्या सर्वांनाच या परीक्षा महत्त्वपूर्ण व उपयुक्त ठरतील यात शंकाच नाही. पालकांनी या परीक्षेचे महत्त्व जाणून आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे. एक कलाप्रेमी नागरिक होण्यास मदत होईल. हा लेख वाचून आपणास प्रेरणा मिळाली तर आपणही चित्रकला ग्रेड परीक्षेस बसा. ही परीक्षा केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठीच आहे असे नाही, तर अनेक कलारसिक प्रौढ मंडळीही ह्या परीक्षांना बसू शकतात.
                                                                                                         ♦ लेखक ♦
                                                                                                श्रीराम साहेबराव महाजन 
                                                                                                      (कला शिक्षक) 
                                                                                        चेंबूर कर्नाटका हायस्कूल, चेंबूर. मुंबई

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: