दिवा -शिळ रस्त्याच्या कामाचे ऑडिट करून कंत्राटदार,अधिकाऱ्यांवर कारवाई करा
आमदार राजू पाटील यांची आयुक्तांकडे मागणी
अक्षराज : विनोद वास्कर
दि. २९, दिवा (ठाणे) : दिवा-शिळ रस्त्याच्या कामाचे ऑडिट करून कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे आयुक्तांकडे केली आहे. दिवा स्टेशन ते दिवा – शिळ हा मुंब्रा, नवी मुंबई, ठाणे शहरात जोडणारा एकमेव मार्ग आहे. सदर रस्त्याचे काम चालू असून सद्यस्थितीमध्ये कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत.
गटाराची कामे केले नाहीत, व बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे खोद काम करून अर्धवट सोडले आहे. त्यामुळे प्रवासांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिळ-दिवा रस्त्याच्या दुरवस्थेला ठाणे मनपातील या रस्त्यासाठी नियुक्त अभियंते व कंत्राटदार जबाबदार आहेत. कारण महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये वारंवार रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. प्रत्यक्षात दौरा करूनही वस्तुस्थिती निदर्शनास आणली होती. परंतु कंत्राटदार काम असताना अभियंत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
त्यामुळेच या रस्त्याची दुरावस्था झाली असून. मनपाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. आज शिळ ते दिवा स्टेशन पर्यंत संपूर्ण रस्त्यावर पाणी साचलेले आहे. प्रवासांना, शाळेकरी विद्यार्थ्यांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे आयुक्त यांनी या रस्त्याची पाहणी करावी. व रस्त्याच्या ऑडिट करण्याचे आदेश द्यावे. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार धरून कंत्राटदार व महापालिका अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे. अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी ठाणे आयुक्त यांच्याकडे केली आहे.